समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 10:35 AM2024-06-09T10:35:40+5:302024-06-09T10:41:04+5:30
सध्या देशातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे.
iphone Viral News : समाजात अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची सोशल मीडियावर फार चर्चा रंगते. अनोखा अपघात असो की मग अतिउत्साही तरूण-तरूणीची रिल्स. सध्या देशातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. या वर्षाच्या पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही अनेकदा उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या निरपराध लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेले बचाव कार्य पाहिले असेलच, पण मोबाईल फोनच्या रेस्क्यू ऑपरेशनची विचित्र घटना घडली आहे. खरे तर केरळमधील वर्कला येथे घडलेली ही घटना खरोखरच मनोरंजक आहे.
कर्नाटकातील एक महिला येथे फिरायला आली होती. समुद्रकिनारी दगडांमध्ये उभी राहून ती निसर्गाचा आनंद घेत होती. अशातच या महिलेचा आयफोन समुद्रकिनाऱ्यावरील दगडांमध्ये पडला. यानंतर अग्निशमन दलाकडून सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवून दीड लाख रुपये किमतीचा फोन वाचवण्यात आला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
७ तास चालले बचावकार्य
संबंधित महिलेने ती राहत असलेल्या रिसॉर्टमधील लोकांकडे मदत मागितली. स्थानिकांनी तात्काळ केरळ अग्निशमन आणि बचाव सेवेला मदतीसाठी कॉल केला. त्यानंतर ७ तास ऑपरेशन सुरू राहिल्याने अथक प्रयत्नांनंतर त्यांनी फोन बाहेर काढला. रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून घटनेची माहिती दिली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की फोन काढण्यासाठी कसा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या अनोख्या बचाव कार्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देऊन या घटनेवर व्यक्त होत आहेत. काहींनी मिश्किल प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. तर अनेकांनी संबंधित महिलेवर हलगर्जीपणाचा आरोप लगावला.