पुणे/नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील ठिकाणी प्रचारही जोमात सुरू झाला आहे. संपूर्ण एप्रिल, मे महिन्यात सात टप्प्यांत निवडणुका होत असून, त्याच काळात देशभरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीयहवामान विभागाने वर्तविला आहे. त्यातही मध्य आणि पश्चिम भारताला अधिक धोका असल्याचे म्हटले आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव कसा करावा, यासाठी मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत हवामानविषयक अंदाज जारी केला. महाराष्ट्रातही तापमान वाढणार १९ व २६ एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यातील काही मतदारसंघात मतदान होत आहे. एप्रिल महिन्यात कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, चौथा टप्प्यात १३ मे रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मतदान होत आहे, तर पाचवा टप्पा २० मे रोजी उत्तर महाराष्ट्र, मुंबई परिसरात मतदान होणार आहे. या भागातील सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक असण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
बंगालमध्ये वादळाचे थैमान; ५ जणांचा मृत्यूपश्चिम बंगालसह आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये रविवारी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये बसला. येथे पाच जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले. त्याशिवाय शयजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी येथेही वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली.
देशात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याने आणि लोकसभेच्या निवडणुकाही असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्याचे नागरिकांनी पालन करावे. - किरण रिजिजू, केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री