छत्तीसगड- छत्तीसगडमधील अंबिकापूर शहरात जंगली हत्तीने एका तरुणाचा चिरडून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी गडघाट बन्सबारीजवळ युवकाचा मृतदेह पडलेला आढळून आला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
गेल्या तीन दिवसांपासून जंगली हत्ती शहराजवळ तळ ठोकून असल्याचे सांगण्यात येत आहे. गडघाटासमोरील लालमातीच्या जंगलात ते आजही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश केरकेट्टा आपल्या सासरच्या घरी दुचाकीवरुन रात्री जात होता. त्याच्यासह एक मित्र देखील होता. याचदरम्यान गडघाटाकडे हत्ती आल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे त्या दोघांनी बांसबारीच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र या मार्गावर देखील अचानक हत्ती आल्याचे दिसून आले. यानंतर प्रकाश केरकट्टावर हत्तीने हल्ला केल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
साथीदाराने संपूर्ण घटना सांगितली-
प्रकाश केरकेट्टा यांच्यासोबत आलेल्या तरुणाने सांगितले की, दोघेही शनिवारी रात्री बांसबारीच्या दिशेने जात होते. यादरम्यान अचानक हत्ती समोर आल्याने दोघेही पळू लागले. हत्तीने त्याचा पाठलाग केला असता प्रकाश केरकेट्टा खड्ड्यात पडला. यानंतर हत्तीने त्यावर हल्ला केला आणि प्रकाश केरकट्टाला चिरडून ठार केले. सदर घटनेनंतर प्रकाश केरकट्टाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
शहराच्या हद्दीजवळ तीन दिवसांपासून हत्तीचा मुक्काम
मिळालेल्या माहितीनूसार, तीन दिवसांपूर्वी १९ जानेवारीला सकाळी कल्याणपूरच्या जंगलातून भटकत असताना हत्ती शहराच्या हद्दीत आला. सरगव्हाणमध्ये हत्तीने एका खासगी शेतातील वांड्रिवाल आणि संजय पार्कजवळील सीसीएफचा बंगल्याचे नुकसान केले.