मंड्या : कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पांडवपुरा शहरातील या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, इथे नुकत्याच जन्म झालेल्या नवजात अर्भकाला १० फूट खोल विहीरीत फेकून देण्यात आले. लक्षणीय बाब म्हणजे खोल विहीरीत फेकल्यानंतर देखील बालकाचा जीव वाचला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या बालकावर मंड्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्ससमध्ये उपचार सुरू आहेत. मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवजात अर्भकाने मृत्यूवर मिळवला विजय नवजात बालकाचा आरडाओरडा कानावर पडताच जवळच्या चंद्रा गावातील नागरिकांनी शुक्रवारी नवजात मुलाला विहिरीतून बाहेर काढले. स्थानिक केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर नवजात बाळाला तात्काळ एमआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले. सुदैवाने या बालकाला पाठीच्या दुखापतीव्यतिरिक्त कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. बाळाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
मंत्र्यांनी घेतली घटनेची दखल बाळाचा जन्म वेळेआधीच झाला असल्याने त्याचे वजन केवळ दीड किलो होते. मुलावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मंत्री के. गोपालय्या यांनी शनिवारी एमआयएमएसला भेट देऊन नवजात अर्भकाच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि अधिकाऱ्यांना चांगली काळजी देण्याचे निर्देश दिले आहेत. अशा घटना होण्याचे प्रमाण परिसरात वाढत असल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.
सोमवारी रायचूर जिल्ह्यातील मस्की तालुक्यातून देखील अशीच एक घटना समोर आली होती. जिथे सांतेकेलूर गावातील घनमाथा कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाने गरम पाणी टाकल्याने इयत्ता दुसरीतील आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या पोटाला आणि मांडीला गंभीर दुखापत झाली होती. पीडित अखिल व्यंकटेश याला २ सप्टेंबर रोजी लिंगसुगुर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र ही घटना उशिरा उघडकीस आल्यानंतर बालकल्याण समितीच्या संचालकांनी मस्की पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.