Biparjoy Cyclone Updates : कच्छ-सौराष्ट्र परिसरात धुमाकूळ घालणारे बिपरजॉय वादळ आज राजस्थानकडे वळले आहे. सर्वांना धडकी भरवणारं बिपरजॉय चक्रीवादळगुजरातच्या किनारपट्टीवर दाखल झाले होते. अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळानेगुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्रमधील काही भागात धुमाकूळ घातला. लक्षणीय बाब म्हणजे किनारपट्टीवर आदळण्यापूर्वी ते किंचित स्वरूपात मवाळ झाले होते, परंतु तरीही त्याने काही प्रमाणात हानी पोहचवली.
आयएमडी दिल्लीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाने उत्तर-पूर्वकडे कूच केली असून ते आता गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोलावीरा परिसरात स्थित आहे. वादळाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. आता हे ८०-९० प्रतितास वेगाने पुढे सरसावत आहे. वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी गुजरातच्या काही भागांतील लोकांना या वादळामुळे मोठा फटका सहन करावा लागला.
गुजरातच्या भुज येथील भवानीपार गावाजवळ बिपरजॉयच्या प्रभावामुळे आलेल्या जोरदार वारा आणि पावसात एक छोटा पूल वाहून गेला. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात बुधवारी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडला. कच्छ, सौराष्ट्र हा परिसर ओलांडल्यानंतर या वादळाचा प्रभाव शुक्रवारी दक्षिण राजस्थानवर दिसत आहे. १७ जूननंतर परिस्थिती सुधारू शकते. ६-७ जून रोजी आग्नेय अरबी समुद्रावर बिपरजॉय तयार झाले. यानंतर ११ जून रोजी त्याचे तीव्र वादळात रूपांतर झाले.