लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड: लष्करी जवानाच्या विधवेने पतीच्या भावाबरोबर दुसरा विवाह केला तरी तिला पेन्शनचा अधिकार आहे, असे आदेश पंजाब व हरयाणा हायकोर्टाने दिले आहेत.
याचिका दाखल करणाऱ्या महिलेचा विवाह १९७४ मध्ये महेंद्र सिंह यांच्याशी झाला होता. एका वर्षाने त्यांना एक मुलगी झाली. महेंद्र सिंह यांना वायुदलात नियुक्ती मिळाली होती. १९७५ मध्ये सेवेच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी सुखजीत कौर यांना पेन्शन मिळाली. या कालावधीत सुखजीत कौर यांनी पतीच्या लहान भावासोबत विवाह केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर १९८२ मध्ये केंद्र सरकारने सुखजीत कौर यांची पेन्शन रोखली.
कॅटने २०१६ मध्ये याचिका फेटाळल्यानंतर सुखजीत यांनी पंजाब व हरयाणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, लष्करी सेवेच्या कालावधीत मृत्यू झालेल्या जवानाच्या विधवेबाबत भेदभाव केला जाऊ नये. याबरोबरच बंद केलेली पेन्शन सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले.