तेलंगणातील रंगारेड्डी येथे एका भरधाव कारने रस्त्यावरून चालत असलेल्या तीन महिलांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर तिन्ही महिला दूरवर फेकल्या गेल्या. मंगळवारी झालेल्या या अपघातात तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ही घटना हैदरशकोटच्या नरसानीगी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
माहितीनुसार, स्थानिक पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. कारचा वेग जास्त असल्याकारणाने चालकाचे नियंत्रण सुटले अन् हा भीषण अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये आई, मुलगी आणि त्यांच्या ओळखीच्या एका महिलेचा समावेश आहे. या तिघीही मॉर्निंग वॉकसाठी जात असताना हा अपघात झाला. तिन्ही महिला रस्त्याने चालत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
अपघातांचे सत्र सुरूचमागील काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये भीषण अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलीकडेच महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर बस जळून झालेल्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनर हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन वाहनांना उडविल्यानंतर कंटेनर हॉटेल तोडून बाहेर पडला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत कार्य सुरू झालेले आहे. दरम्यान, या आपघातातील मृतांचा आकडा वाढून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.