उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे होळीच्या दिवशी हर्षिता वर्मा या २२ वर्षीय तरुणीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर तिचा मित्र लव्या जोशी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून एका सफारीने त्यांच्या स्कूटीला धडक दिल्याचे त्यात दिसत आहे. धडक लागल्यानंतर तरुणींना काही अंतरापर्यंत कार चालकानं फरफटत नेल्याचेही समोर आलेय. दरम्यान, पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून त्या कारवर पोलिसांचे स्टिकर असल्याचे म्हटले जातेय.
सफारी कार एका चौकातून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. हर्षिता वर्मा नावाची तरुणी आपल्या मैत्रिणीला सोडण्यासाठी जात अस असतानाच एका शाळेनजीक ही घटना घडली. यात हर्षिताचा जागीच मृत्यू झाला.इतकंच नाही तर आणखी एक व्हिडीओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये अपघातानंतर सफारी कारचा चालक वेगाने घेऊन जाताना दिसतोय. तसंच स्कूटर चालकही त्याला त्याचा पाठलाग करुन थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. परंतु सफारी कार चालकाने कार वेगाने पुढे नेली.
आरोपी कार चालकाला कारसह अटक करण्यात आली आहे. किरण जोशी असे त्याचे नाव आहे. तो मुळात पिथौरागढचा रहिवासी आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सफारी कारच्या वर पोलीस असे लिहिण्यात आले आहे. सफारी कार एका पोलीस उपनिरीक्षकाची असल्याचे सांगितले जात आहे. परंतु ती काही महिन्यांपूर्वी एका ऑटो डीलरला विकण्यात आली होती.