नवी दिल्ली : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेऊन त्यांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा अर्धाकृती पुतळा भेट दिला. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे एमडी आणि संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा हे उपस्थित होते. बाबूजींचे जन्म आणि कर्मस्थळ यवतमाळमध्ये २ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमातून त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. यावेळी समाजातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्वावरील ‘बाबूजी’ या पुस्तकाचेही प्रकाशन झाले होते.
विजय दर्डा यांनी मार्बल डस्ट आणि सिरॅमिकपासून निर्मित बाबूजी यांची प्रतिकृती राष्ट्रपतींना भेट दिली. यावेळी विजय दर्डा यांनी आपले ‘रिंगसाइड : अप क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियाँड’ हे पुस्तकही राष्ट्रपतींना भेट दिले. बाबूजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार सूर्यकांत लोखंडे यांनी पांढऱ्या मार्बल डस्ट आणि सिरॅमिकने केली आहे. या अतिशय सुंदर पुतळ्याच्या खालच्या भागावर बाबूजींची स्वाक्षरीही आहे.
राष्ट्रपती भवनमध्ये आठवणींना उजाळाबाबूजींच्या आठवणींना उजाळा देत राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, लोकमत आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, तो बाबूजींमुळेच आहे.