विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राजस्थानमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. राजस्थानमधील विधानसभेच्या २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराची असलेली परंपरा तोडण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. तर भाजपाने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र निवडणुकीचा प्रचार ऐन बहरात आला असताना काँग्रेससमोर वेगळीच समस्या निर्माण झालेली आहे. राज्यातील पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री निवडणूक लढवण्यास नकार देत आहेत.
एकीकडे भाजपामध्य़े तिकीट वाटप आणि उमेदवारी न मिळाल्याने नेते नाराज आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सरकारमधील मंत्रीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास कचरत आहेत. अशोक गहलोत सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री असलेल्या हेमाराम चौधरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आपल्या जागी कुठल्या तरी तरुण नेत्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
हेमाराम चौधरी यांच्यानंतर आता राजस्थान सरकारमधील कृषिमंत्री लालचंद कटारिया यांनीही आपण निवडणूक लढवण्यास इच्छूक नसल्याचं सांगितलं आहे. आध्यात्मावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भरत सिंह यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आता एकापाठोपाठ एक मंत्री आणि माजी मंत्री राजीनामा देत असल्याने सत्ताधारी पक्षामध्ये सारं काही आलबेल आहे का? असा प्रश्न पडला आहे.
हेमाराम चौधरी आणि लालचंद कटारिया यांची गणती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय म्हणून गणना होते. मात्र तरीही ते निवडणूक लढवण्यास नकार का देत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. हेमाराम चौधरी यांनी २०१३ आणि २०१८च्या विधानसभा निवडणुकीवेळीही निवडणूक लढवण्यास नकाल दिला होता. मात्र नंतर मनधरणी करण्यात आल्यानंतर हेमाराम चौधरी निवडणूक लढवण्यास तयार झाले होते.
तर लालचंद कटारिया यांच्या निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याच्या निर्णयाबाबत सांगण्यात येतेय की, ते ज्या झोटवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. त्या मतदारसंघामध्ये भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. भाजपाने इथे माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना उमेदवारी दिली आहे. याआधी राज्यवर्धन सिंह राठोड आणि लालचंद कटारिया यांचा आमना-सामना लोकसभा निवडणुकीतही झाला होता. त्यावेळी राज्यवर्धन सिंह राठोड यांनी बाजी मारली होती.