मविआ, विरोधी ऐक्याला जोरदार धक्का; शरद पवारांच्या महत्त्वाच्या भूमिकेविषयी अनिश्चितता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:00 AM2023-07-03T07:00:24+5:302023-07-03T07:00:42+5:30
लोकसभा निवडणुकांमध्ये वज्रमूठ सैल होणार?
-सुनील चावके
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर ‘आदर्श’ ठरू पाहणाऱ्या महाराष्ट्रातच विरोधी ऐक्याला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष वर्षभराच्या अंतरात फुटून खिळखिळे झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या संभाव्य महत्त्वाच्या भूमिकेविषयी अनिश्चितता
निर्माण झाली आहे. दिल्लीतील भाजपश्रेष्ठींच्या इशाऱ्यावरून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे पवार यांच्यासह अवघ्या विरोधी पक्षांच्या मनसुब्यांना जोरदार हादरा बसला आहे.
शरद पवार २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आणि महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबतच शरद पवार यांच्याकडे विरोधी ऐक्याचे शिल्पकार म्हणून बघितले जात होते. विरोधी ऐक्याची पुढची बैठक शिमल्याऐवजी १२-१३ जुलै रोजी बंगळुरूला होईल, अशी घोषणा करून पवार यांनी आपले नेतृत्वही सिद्ध केले होते; पण त्यापूर्वीच राष्ट्रवादीला खिंडार पडले.
आदल्या दिवशी अजित पवार दिल्लीत मुक्कामी?
पक्षात नेतृत्वाची भाकरी फिरविताना अजित पवार यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली नाही म्हणून पवारांच्या नेतृत्वाला धक्का देणारी ही बंडखोरी झाल्याचा भाजपच्या गोटातून दावा करण्यात येत आहे. मात्र, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या भीतीने अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या गळाला लागल्याचा आरोप विरोधी पक्षांचे नेते करीत आहेत.
‘मिशन ४५’ची अशी आहे रणनीती
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात मारलेली मुसंडी मिशन ४५चे लक्ष्य असलेल्या भाजपच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. बीआरएससोबत असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि प्रसंगी आम आदमी पार्टीने हातमिळवणी करून महाराष्ट्रात तिसरी आघाडी मैदानात उतरवायची. त्यातून महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन घडवून आपले उमेदवार विजयी करायचे. दुसरीकडे अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम आणि अदिती तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रातील लोकसभेच्या जागा काबीज करत मिशन ४५ साध्य करायचे, अशी रणनीती भाजपने आखल्याचे म्हटले जात आहे.