Ludhiana Oil Tanker Fire: पंजाबमधील लुधियाना येथे बुधवारी आगीचे तांडव पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तेलाने भरलेल्या टँकरला आग लागली अन् वाहतूक विस्कळीत झाली. हळू हळू या आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. लुधियाना-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. खन्ना येथील बसस्थानकाजवळ तेलाने भरलेल्या टँकरला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खन्ना लुधियाना या भागात तेलाचा टँकर दुभाजकाला धडकून उलटल्यानंतर भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच ऑईल टँकरने पेट घेतला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
मात्र, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत टँकर आगीने पूर्णपणे वेढला होता. महामार्गावरील आगीचे भयावह दृश्य व्हिडीओओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेत संपूर्ण उड्डाणपूल आगीच्या भक्ष्यस्थानी आला. आग लागल्यानंतर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदैवीने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. मात्र, टँकर उलटल्यानंतर आग लागल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे.