पंजाबच्या खन्ना जिल्ह्यात सकाळी सकाळी मोठा अपघात झाला आहे. प्रचंड धुरक्यामुळे एकामागोमाग एक अशा अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये १०० च्या आसपास वाहने दुर्घटनाग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे.
या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू आणि सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. यापूर्वी असे अपघात उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एक्स्प्रेसवेवर होत होते.
दिल्ली आणि आजुबाजुच्या राज्यांमध्ये प्रदुषणाची मोठी समस्या आहे. यातच गेले काही दिवस शेतकरी शेतातील तण जाळत आहेत. तसेच फटाकेही मोठ्या प्रमाणावर वाजविले जात आहेत. याचा परिणाम थंडीत धुके आणि धुळ, धुर मिळून धुरक्यात होत आहे. यामुळे रात्रीचीच नाही तर दिवसाचीही दृष्यमानता कमी होत आहे.
मोठ्या संख्येने वाहने आदळल्याने रस्ता ब्लॉक झाला होता. काही जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये तर काहींना इतर ठिकाणी पाठविण्यात आले आहे. अनेक गाड्यांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांना पोलिसांनी एका बाजुला करत रस्ता मोकळा केला आहे.