'माझ्या आईला तुरुंगात टाका', तक्रार घेऊन वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आला तीन वर्षांचा चिमुकला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:40 PM2022-10-18T12:40:11+5:302022-10-18T12:42:20+5:30
Crime News: 'माझ्या आईला तुरुंगात टाका', असे सांगत एक तीन वर्षांचा चिमुकला तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. या बातमीच्या फोटोमध्ये एक महिला सब इन्स्पेक्टर काहीतरी लिहीत आहे आणि एक छोटा मुलगा तिच्याजवळ उभा असलेला तुम्ही पाहू शकता. हा मुलगा त्याच्या आईबाबतची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. आई त्याला कसा त्रास देते हे त्याने त्याच्या बालसुलभ पद्धतीने केलेलं कथन ऐकून महिला सब-इन्स्पेक्टरलाही हसू आवरता आले नाही. आता पोलीस ठाण्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याने केलेली तक्रार ही जिल्हा मुख्यालयापर्यंत चर्चेचा विषय ठरली आहे.
मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर जिल्ह्यापासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या देडतलाई गावातून हा प्रकार समोर आला आहे. त्याचं झालं असं की, त्या मुलाची आई त्याला आंघोळ घालत होती. आंघोळ करताना हा मुलगा मस्ती करत होता. तसेच इकडे तिकडे पाणी उडवत होता. त्यामुळे रागावलेल्या आईने त्याच्यावर एक फटका मारला. त्यामुळे हा मुलगा रडू लागला. तसेच रागाने त्याने आईची तक्रार वडीलांकडे केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो वडिलांना घेऊन पोलीस ठाण्यामध्येही गेला.
त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यात त्याने सांगितले की, माझी आई मला नेहमी मारते. घाबरवते. मला खेळणी देत नाही. तसेच माझ्या सर्व गोष्टी, चॉकलेट, बिस्किट वगैरे चोरून एकट्यानेच खाते. मला पैसेही देत नाही आणि वडील जे पैसे देतात तेसुद्धा आपल्याकडे ठेवून घेते. त्यामुळे तुम्ही तिला तुरुंगात टाका. या चिमुकल्याने केलेली गौंडस तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू आवरले नाही. त्यांनी या मुलाची तक्रार घेऊन कारवाईचं आश्वासन दिलं.