झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्ही, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची अधिकृत सोय आणि बरच काही... पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणून सांगणाऱ्या गुजरातमच्या एका ठगाला जम्मू काश्मीर प्रशासनाकडून सुविधा घेणं आणि सुरक्षा व्यवस्थेची खिल्ली उडवण्यात यश आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या व्यक्तीचं नाव किरणभाई पटेल असून त्यानं या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरच्या दोन दौऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या अनेक बैठकाही घेतल्या होत्या.
पंतप्रधान कार्यालयातील रणनीती आणि ऑपरेशन्सचे अतिरिक्त संचालक म्हणून स्वत:ची ओळख दाखवणाऱ्या किरणभाई पटेल याला सुमारे १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी त्यांची अटक गुप्त ठेवली होती. गुरुवारी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. एनडीटीव्हीनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. त्याच्या अटकेच्या दिवशी एफआयआर नोंदवण्यात आला होता की तो नोंदवण्यात काही विलंब झाला होता हे स्पष्ट झालेले नाही.
फेब्रुवारीमध्ये त्यानं काश्मीर खोऱ्यात पहिली भेट दिली होती. त्यानंतर त्यानं हेल्थ रिसॉर्टचाही दौरा केला. पॅरामिलिट्री गार्ड आणि पोलीस संरक्षणात त्यानं विविध ठिकाणी भेटी दिल्याचे अनेक व्हिडीओ आहेत. तो पॅरामिलिट्री गार्डसह बडगाममधील दूधपथरी येथील बर्फाच्छादित मार्गातून जाताना दिसत आहे. श्रीनगरमधील क्लॉक टॉवर लाल चौकासमोरही तो फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे.
बैठकाही घेतल्यागुजरातमधून अधिक पर्यटक या ठिकाणी यावे यासाठी आणि दूधपथरी हे प्रमुख पर्यटन स्थळ बनवण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी पटेल यानं अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दोन आठवड्यांत श्रीनगरला दुसऱ्यांदा भेट दिल्यानंतर पटेल संशयाच्या भोवऱ्यात आला. जिल्हा दंडाधिकारी म्हणून तैनात असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्यानं गेल्या महिन्यात ‘वरिष्ठ पीएमओ अधिकाऱ्याच्या’ भेटीबद्दल पोलिसांना माहिती दिल्याचं सूत्रांनी म्हटलं.
गुप्तचर यंत्रणांनी पीएमओ अधिकारी म्हणून भासवत असलेल्या एका ठगाबद्दल पोलिसांना सतर्क केलं. त्याची पार्श्वभूमी पडताळून पाहिल्यानंतर पोलिसांना श्रीनगरमधील हॉटेलमधून त्या व्यक्तीला अटक करण्यास सांगण्यात आलं. याशिवाय दोन पोलीस अधिकार्यांवर घोडचूक आणि वेळीच फसवणूक करणार्याचा शोध न घेतल्यानं कारवाई सुरू करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. गुजरात पोलिसांचं एक पथकही तपासात सहभागी होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.