अजमेर - राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील सेवर ठाणे पोलीस परिसरात शनिवारी सिमेंटच्या पोत्यांची वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाला. या दुर्घटनेत टिप्परचालकाचा जागेवरच मृत्यू झाला. हा टिप्पर भरतपूरकडेच येत होता. त्यावेळी, आरटीओच्या पथकाने टिप्परवर कारवाई करण्यासाठी आपली जीप गाडीमागे लावली. या धावपळीत काही अंतरावर पुढे जाताच टिप्पर पलटी झाला.
अजमेरच्या केसरपुरा येथे राहणारा गजेंद्र (३०) अजमेरहून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला टिप्पर घेऊन भरतपूरला जात होता. आग्रा-जयपूर नॅशनल हायवे मार्गावर आरटीओच्या पथकाने नाकाबंदी केली होती. त्यावेळी, सर्वच लोडिंग वाहनांची तपासणी केली जात होती. या दरम्यान, समोरुन येत असलेल्या सिमेंटने भरलेल्या टिप्परला थांबण्यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी हात केला. मात्र, चालक गजेंद्रने टिप्पर थांबवला नाही. त्यामुळे, आरटीओ अधिकाऱ्याने या टिप्परच्या पाठिमागे आपली जीप पाठवली.
आरटीओ अधिकाऱ्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी गजेंद्रने टिप्पर वेगात चालवला. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टिप्पर पलटी झाला. त्यामुळे, टिप्परमधील सिमेंटची पोतीही रस्त्यावर पडली. तर, चालक केबिनमध्ये अडकला. मात्र, आरटीओ अधिकारी आणि कर्मचारी टिप्पर चालकाला मरणावस्थेत सोडून पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, येथील मजूर राकेश याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी खटला दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.