‘इंडिया’कडून मोदींना कडवी टक्कर, २०२४ मध्ये कोण बाजी मारणार? समोर आली अशी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:34 PM2023-08-16T22:34:06+5:302023-08-16T22:35:22+5:30
Loksabha Election 2024: आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल याचा अंदाज घेणारा टाइम्स नाऊ-नवभारतने केलेला सर्व्हे समोर आला आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल याचा अंदाज घेणारा टाइम्स नाऊ-नवभारतने केलेला सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून देशात अनेक ठिकाणी मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये कडवी टक्कर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर करण्यात आलेल्या या सर्व्हेनुसार देशभरात एनडीए आणि इंडियामध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे. आज लोकसभेची निवडणूक झाल्यास एनडीएला एकूण मतांपैकी ४२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला ४० टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
जागांचा विचार केल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९६ ते ३२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला १६० ते १९० जागा मिळण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पुन्हा एकदा मुसंडी मारण्याची शक्यता असून, इथे भाजपाला ६९ ते ७३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला इखे ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला ० ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यामध्ये १ ते ३ जागा जाण्याची शक्यता आहे.