सत्ता जाताच हिमाचलमध्ये भाजपाला सुरुंग? अनेक आमदार काँग्रेसच्या संपर्कात, सुखविंदर सिंह सुक्खू यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 04:23 PM2022-12-10T16:23:05+5:302022-12-10T16:25:44+5:30
Himachal Pradesh: भाजपामधील काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी संपर्कात असल्याचा दावा करून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी खळबळ उडवून दिली आहे.
सिमला - काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस निर्माण झालेला आहे. काँग्रेसकडे ४० आमदारांचे बहुमत आहे. दरम्यान, भाजपामधील काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी संपर्कात असल्याचा दावा करून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी खळबळ उडवून दिली आहे. हिमचालमध्ये काँग्रेसकडे ४३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये ३ अपक्षांचा समावेश आहे. तसेच भाजपाचे काही आमदार काँग्रेससोबत येऊ शकतात.
८ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान झाले होते. तेव्हा तब्बल ७६.४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या आमदारांच्या दलाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. आता सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या निवडीचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले की, पार्टी हायकमांड कुणाचीही नेता म्हणून निवड करू शकतात. दरम्यान, पक्ष निरीक्षक शनिवारी संध्याकाळी किंवा रविवार पर्यंत आपला अहवाल पार्टी हायकमांडकडे सोपवतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुठल्याही आमदाराने कुणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आणि कॅबिनेटबाबच लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.