नवी दिल्ली: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळचेविमान रविवारी कोसळून ६८ जण ठार झाले होते. त्यातील ३५ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अपघातग्रस्त विमानातील चारजण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताने एका मोठ्या कंपनीच्या संस्थापकावर दहशत पसरली आहे. याचदरम्यान स्नॅपडील या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ कुणाल बहल यांचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी पोखराहून कधीही विमानाने प्रवास करू नका असे म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या अनुभवांचा संदर्भ देत हे ट्विट केले आहे.
कुणाल बहल नेपाळमध्ये वारंवार होणाऱ्या विमान अपघातांमुळे घाबरले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेपाळच्या विमान कंपनीच्या विमानांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मला अशा भयानक अपघाताची अपेक्षा होती. मी नेपाळमधील विमान कंपनीकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याचे कुणाल बहाल यांनी म्हटलं आहे.
कुणाल बहल यांनी ट्विटमध्ये त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत लिहिले की, 'ही घटना खरोखरच खूप दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी माझी पोखराहून फ्लाइट होती. मी जेव्हा विमानाने प्रवास करत होतो तेव्हा खिडकीच्या कोपऱ्यातून हवेचा जोरदार प्रवाह येत होता. मी तक्रार केल्यावर त्या अटेंडंटने टिश्यू पेपर आणला आणि जिथून हवा येत होती तो गॅप भरला. या अनुभवानंतर मी ठरवलं होतं की, पोखराहून पुन्हा कधीच फ्लाइट घेणार नाही.
३० वर्षांत २७ अपघात-
नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते. जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.
हिमालयाचे आव्हान
नेपाळमध्ये वैमानिकांना खरे आव्हान हिमालयातील उंच पर्वत शिखरांचेच आहे. जुनाट विमानेही अपघातांना हातभार लावत आहेत. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अनुभवी वैमानिक यामुळे नेपाळला उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनवले आहे.