गुरुग्राम - पोलीस आणि न्यायालयाचं दैनिक कामकाज असते, त्यामुळेच पोलीस अधिकारी संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयात बाजू मांडत असतात. त्यावेळी, न्यायाधीश महोदयांसमोर जाऊन अनेकदा त्यांना प्रकरणातील बाबींवर तपासाची माहिती द्यावी लागते. न्यायालयाचा सन्मान करत पोलिसांकडून न्यायाधीश महोदयांना सॅल्यूट केला जातो. मात्र, गुरुग्राम येथील एसीपी अधिकाऱ्यास न्यायाधीशांना नीट सॅल्यूट न करणे भोवले आहे. संबंधित एसीपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशच जिल्हा न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
जिल्हा न्यायाधीश फर्स्ट क्लास विक्रांत यांच्या न्यायालयाने पोलीस आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी एसीपी नवीन शर्मा आपल्या पथकासह फसवणूकीच्या एका प्रकरणातील आरोपीला घेऊन न्यायालयात पोहोचले होते. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर, तेथून जात असताना त्यांनी न्यायाधीशांना सॅल्यूट करताना, केवळ दोन बोटांनी सॅल्यूट केला. त्यामुळे, न्यायाधीश महोदयांनी अशाप्रकारे सॅल्यूट करण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी, आपण तीनप्रकारे सॅल्यूट करण्याचं प्रशिक्षण घेतलं असल्याचं एसीपी नवीन शर्मा यांनी दिलं. तसेच, माझा शर्ट फीट असल्याने मी योग्य पद्धतीने सॅल्यूट करु शकलो नाही, असेही ते म्हणाले.
एसीपीच्या उत्तरावर न्यायालयाने त्यांना पंबाज पोलीस नियम १९३४ चा दाखला दिला. त्यानुसार, प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने वर्दीमध्ये न्यायालयात प्रवेश करताना, तिथे न्यायालय सुरू असल्यास न्यायाधीशांना सॅल्यूट केला पाहिजे. विशेष म्हणजे, त्या न्यायालयातील न्यायाधीश महोदयांची रँक काहीही असो, पण त्यांना सॅल्यूट केलाच पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले. नियम आणि प्रोटोकॉलची माहिती देत संबंधित एसीपींना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचंही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, याप्रकरणी न्यायलायाने पोलीस आयुक्तांना संबंधित एसीपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून त्याचा अहवालही न्यायालयात सादर करण्याचे बजावले आहे. आता, याप्रकरणी डीसीपी वेस्ट करण गोयल लवकरच अहवाल सादर करतील.