मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत अनोखा विवाह; 75 वर्षीय 'नवरदेवा'ला उचलून आणावं लागलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:54 PM2023-02-17T17:54:20+5:302023-02-17T17:55:29+5:30
मुख्यमंत्री सामूहिक कन्या विवाह योजनेअंतर्गत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.
सतना : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक कन्या विवाह योजनेअंतर्गत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. इथे मुख्यमंत्री सामूहिक कन्या विवाह योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातच एक अनोखा विवाह सोहळा रामनगर जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आझाद मैदानावर आयोजित सामूहिक विवाह परिषदेत एकूण 135 जोडपी विवाहबंधनात अडकली.
अनोख्या विवाहाची रंगली चर्चा
या अनोख्या विवाहसोहळ्यास मध्य प्रदेश सरकारचे राज्यमंत्री रामखेलावन पटेल यांनी देखील हजेरी लावली होती. खरं तर इथे 65 वर्षीय मोहनियाबाई यांचा विवाह 75 वर्षीय भगवानदिन सिंग गोंड यांच्याशी झाला. हे दोघेही वृद्ध जवळपास 10 वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. लक्षणीय बाब म्हणजे वधू मोहनियाने लग्न केले नव्हते, तर भगवानदिन सिंग गोंड यांच्या पहिल्या पत्नीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ते दोघेही एकत्र राहत होते. वर भगवानदीन जन्मतः एका पायाने अपंग आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून अपत्यही नाही. वयाच्या या नाजूक टप्प्यावर दोघेही एकमेकांच्या वृद्धावस्थेत आधार ठरतील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, सामूहिक कन्या विवाह योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक जोडप्याला रोख रकमेसह घरगुती वस्तू पुरवत असते. एका जोडप्यावर 51 हजार रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. या रकमेतून मंडप आणि जेवणाच्या बदल्यात 6,000 रुपये कापले जातात, तर 34,000 रुपयांच्या वस्तूंसह 11,000 रुपयांचा धनादेश दिला गेला. रामनगर जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी जोसुआ पीटर यांनी घरगुती वस्तूंच्या वितरणाची माहिती दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"