VIDEO: ना ब्रश ना हातमोजे, भाजपा खासदाराने हातानेच साफ केले शाळेतील शौचालय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:03 PM2022-09-23T16:03:10+5:302022-09-23T16:04:40+5:30
भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी हाताने शाळेतील शौचालय साफ केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्याचे खासदार जनार्दन मिश्रा (BJP MP Janardan Mishra) पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. नेहमी वादामुळे चर्चेत असणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते हाताने शाळेतील शौचालय साफ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार महोदय रीवा जिल्ह्यातील बालिका विद्यालय खटखरी येथे गेले होते. खरं तर हातात ब्रश न घेता आणि हातमोजे देखील न घालता त्यांनी हातांनीच शौचालय साफ केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून ते गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत बीजेपी सेवा मोहिम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर
जनार्दन मिश्रा यांनी बालिका विद्यालयात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला होता.
पार्टी द्वारा चलाये जा रहे सेवा पखवाड़ा के तहत युवा मोर्चा के द्वारा बालिका विद्यालय खटखरी में वृक्षारोपण कार्यक्रम के उपरांत विद्यालय के शौचालय की सफाई की।@narendramodi@JPNadda@blsanthosh@ChouhanShivraj@vdsharmabjp@HitanandSharmapic.twitter.com/138VDOT0n0
— Janardan Mishra (@Janardan_BJP) September 22, 2022
शाळेत फेरफटका मारल्यानंतर शाळेतील शौचालय खराब असल्याचे मिश्रा यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच त्यांनी हातानेच शौचालय साफ करण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे कोणताही ब्रश अथवा हातमोजे न घेता मिश्रा यांनी हातानेच शौचालय साफ केले. तसेच हाताने शौचालय साफ करून स्वच्छता राखण्याचा त्यांनी संदेश दिला आहे.
वादग्रस्त वक्त्व्यांमुळे चर्चेत
जनार्दन मिश्रा यांनी यावेळी म्हटले, "सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते नरेंद्र मोदी स्वच्छतेचा संदेश देत आहेत. याच काहीच नवीन नाही मी यापूर्वी देखील शौचालय साफ केले आहे." याआधी मिश्रा यांनी रिक्शा चालवून घरोघरी जाऊन कचरा गोळा केला होता, तेव्हाही त्यांची खूप चर्चा रंगली होती. ते अनेकवेळा वादग्रस्त वक्त्व्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. कचरा वाढवणाऱ्यांना फासावर चढवा, अशा काही विधानांमुळे ते चर्चेत राहिले होते.