नवी दिल्ली : तामिळनाडूतील तुतीकोरीनमधून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, इथे 2 आरोपी तृतीयपंथी व्यक्तींसोबत अतिशय वाईट वर्तन करत आहेत. हे दोघे या तृतीयपंथी लोकांना मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आणखी एक तृतीयपंथी व्यक्ती सुजलेल्या डोळ्यांनी जमिनीवर बसलेली दिसत आहे. खरं दोन जण निष्पाप तृतीयपंथी व्यक्तींना त्रास देत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांच्यापैकी एकाने तृतीयपंथी व्यक्तीचे जबरदस्तीने केस कापले. व्हिडीओ व्हायरल होताच या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आरोपींची ओळख पटली असून योवा बुबान आणि विजय अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना कालुगुमलाई पोलिसांनी अटक केली आहे. तुतिकोरिनचे पोलीस अधीक्षक बालाजी सरवना यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींवर आयपीसी कलम आणि ट्रान्सजेंडर पीपल्स राइट्स ॲक्ट 2019 अंतर्गत छळ, शिवीगाळ, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
तृतीयपंथीयांकडे केली सेक्सची मागणीहा व्हायरल व्हिडीओ तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रेसा बानू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक आरोपी म्हणतो की, जे इतरांकडून पैसे उकळतात त्यांचे काय करायचे? तर पीडितांनी आरोप केला आहे की, "या दोन तरुणांनी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले, आम्ही मात्र नकार दिल्याने आरोपीने आमच्यासोबत असे वर्तन केले." आरोपींनी या दोन तृतीयपंथीयांना शहरातून हाकलून देण्याची धमकी देखील दिली होती. ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून लोक या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत.