म्हैसूर - पावसाळ्याला सुरुवात झाली असून जोरदार पावासासह विजांचा कडकडाटही ऐकायला येत आहे. देशातील काही राज्यात मान्सुन धुव्वादार कोसळला असून महाराष्ट्रात बळीराजा वाट पाहतोय. मात्र, पावसाळा सुरू झाल्यामुळे महावितरण विभागाकडून मान्सुनपूर्वी मेन्टेन्सचा आराखडा घेण्यात आलाय. पण, निसर्गचक्रापुढे कोणी काहीच करू शकत नाही. पावसाळ्यात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह वीज कोसळण्याच्या घटना घडतात. त्यातच, महावितरणच्या इलेक्ट्रीक वायरीही तुटून पडतात, त्यामुळे विद्यूत प्रवाह वाहून अपघात होतात.
कर्नाटकमधील नागरटोल टायगर रिझर्व्हमध्ये गुरुवारी जुन्या म्हैसूर-नंदावाडी रस्त्यावर अनेमाला येथील एका शेताजवळ हत्तीचा अपघाती मृत्यू झाला. हा जंगली हत्ती विजेच्या ताराच्या संपर्कात आल्याने करंट लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या हत्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची वनपरिक्षेत्र पोलिसांनी दखल घेतली असून ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे समजते.
स्थानिकांनी हत्ती मृत्यू पावल्याची सूचना वन विभागाला दिली होती. त्यानंतर, वन विभागाने घटनास्थळी धाव घेत, हत्तीच्या मृत्यूप्रकरणी उदय उर्फ थॉमस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौर उर्जेसाठी थॉमसने अवैधपणे विद्युत लाईन ओढली होती. त्यामुळेच, विजेची तार तुटून या तारेच्या प्रवाहात हत्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी आल्यानंतर पंचनामा करत, हत्तीचे पार्थिव वन विभागात स्थलांतरीत केले. त्यानंतर, त्याचे शवविच्छेदनही करण्यात आले.
आरोपी उदयवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कलम ९ आणि २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी उदय फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.