इंदूर : पतीसोबत सिंगापूरला फिरायला गेलेली महिला कूझमधून अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ माजली. संबंधित महिलामध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. गायब महिलेचा पती इंदूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आहे. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या मुलाने परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव घेतली. क्रूझमधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने समुद्रात उडी मारली पण त्याचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज मिळालेले नाहीत.
हॉटेल व्यावसायिक जाकेश साहनी यांची पत्नी रिता साहनी क्रूझमधून गायब झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला. ती आपल्या पतीसमवेत चार दिवसांसाठी सिंगापूरच्या दौऱ्यावर गेली होती. लक्षणीय बाब म्हणजे क्रूझ कर्मचाऱ्यांनी महिलेच्या कुटुंबीयांना तिने समुद्रात उडी मारल्याचे सांगितले. मात्र, कोणतेही सीसीटीव्ही फुटेज समोर न आल्याने अद्याप संभ्रम आहे. त्याचवेळी बेपत्ता महिलेच्या पतीला क्रूझमधून उतरवल्याचंही सांगितलं जात आहे. महिला बेपत्ता झाल्यानं खळबळ जाकेश साहनी आणि पत्नी रीता दोघेही चार दिवसांच्या मलेशिया-सिंगापूर दौऱ्यावर गेले होते. स्पेक्ट्रम ऑफ द सीजवरून दोघेही सिंगापूरला परतत होते. प्रवासादरम्यान पती जाकेश झोपी गेले होते. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा रीता बेपत्ता होती. त्यांनी पत्नीला इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीस लागले नाही. तांत्रिक तपासणी केली असता क्रूझमधून समुद्रात काहीतरी पडल्याचे कर्मचाऱ्यांना समजले. त्यानंतर जाकेश यांनी मुलगा अपूर्व याला घटनेची माहिती दिली.
मुलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या अपूर्व साहनी याने आपली आई बेपत्ता झाल्याचे कळताच पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे ट्विटच्या माध्यमातून मदत मागितली. "माझी आई सिंगापूरहून रॉयल कॅरेबियन क्रूझमधून प्रवास करत होती. आज सकाळपासून ती बेपत्ता आहे. क्रूझ कर्मचारी म्हणत आहेत की तिने समुद्रात उडी मारली, परंतु त्यांनी आम्हाला कोणतेही फुटेज दाखवले नाही आणि ते लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणीही मदत केली नाही, माझ्या वडिलांना क्रूझमधून बाहेर काढले, ही माणुसकी आहे का?", अशा आशयाचे ट्विट बेपत्ता महिलेच्या मुलाने केले.