जाणार होते हनिमूनला, नेले अयोध्येला; महिलेने थेट घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात केला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:25 AM2024-01-26T08:25:55+5:302024-01-26T08:27:10+5:30
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचे लग्न झाले होते.
भोपाळ : हनिमूनसाठी गोव्याला नेण्याचे आश्वासन देऊन अयोध्येला नेल्यामुळे एका महिलेने चक्क घटस्फोटासाठी अर्ज केल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये समोर आला आहे. महिलेने घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात सादर केला असून, येथे या जोडप्याचे समुपदेशन करण्यात येत आहे.
काउंसिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांचे लग्न झाले होते. पत्नीला हनिमूनसाठी परदेशात नेण्याचे आश्वासन त्याने दिले होते. मात्र त्याच्या वृद्ध आई-वडिलांना मंदिरात जाण्याची इच्छा असल्याने त्यांनी घरगुती धार्मिक स्थळाला भेट द्यावी, असा आग्रह धरला. अखेर या जोडप्याने हनिमूनसाठी गोव्याला जायचे मान्य केले. महिलेने आरोप केला की, हनिमूनला जाण्यासाठीची सर्व तयारी झाली होती. मात्र पतीने प्रवासाच्या एक दिवस आधी आपण आईच्या इच्छेनुसार अयोध्या आणि वाराणसीला जात आहेत, असे सांगितले होते.
विश्वास तोडला
महिलेने अखेर त्याच्यासोबत अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र माघारी परतल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यामुळे महिलेने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पतीने विश्वास तोडल्याचा आरोप पत्नीने केला आहे.