अवघ्या जगाचे लक्ष वेधणारे बिपरजॉय वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. आज रात्रीपर्यंत हे वादळ गुजरात किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. पण या वादळाच्या आगमनापूर्वीच 'बिपरजॉय'चा जन्म झाला अन् एका माऊलीच्या चेहऱ्यावर आनंदाअश्रू आले. खरं तर हे वादळ येण्याआधीच गुजरातमधील एका महिलेने चिमुकलीला जन्म दिला. त्यामुळे महिलेने आपल्या एका महिन्याच्या मुलीचे नाव 'बिपरजॉय' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, बिपरजॉय वादळ आज संध्याकाळपर्यंत कच्छच्या किनारपट्टीवर धडकू शकते. ज्या घरात एक महिन्यापूर्वी या चिमुकलीचा जन्म झाला ते घर देखील बिपरजॉयमुळे ग्रस्त असून चक्रीवादळाच्या भीतीने त्यांना घर सोडावे लागले आहे. सध्या मुलीचे कुटुंब कच्छ जिल्ह्यातील जखाऊ येथील एका शेल्टर होममध्ये आहे. कच्छमधील आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
'वादळा'वरून नामकरण चक्रीवादळाच्या नावावरून मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी देखील अनेकदा अशा बातम्या समोर आल्या आहेत. यापूर्वी तितली, फणी आणि गुलाब या चक्रीवादळांवरून चिमुकल्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. आता गुजरातच्या किनारपट्टीवर धडकू पाहणाऱ्या या वादळाला नाव बांगलादेशने दिले असून ते जागतिक हवामान संघटनेशी संबंधित देशांनी स्वीकारले आहे. हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, अशा चक्री वादळांचा प्रभाव एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. बिपरजॉय चक्रीवादळ देखील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
'कोरोना'वरूनही ठेवली नावे विशेष बाब म्हणजे भारतात भूतकाळातील आपत्ती किंवा घटनांवरून मुलांची नावे ठेवण्यात आली आहेत. यापूर्वी कोरोना काळात उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या मुलीचे नाव 'कोरोना' असे ठेवले होते. याशिवाय आंध्रच्या कडप्पा जिल्ह्यातील दोन मुलांचे नावही याच विषाणूवर ठेवण्यात आली आहेत.