चंपारण: बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास दीड महिन्यापूर्वी मृत्यू झालेली महिला, जिच्या हत्येच्या आरोपाखाली तिचा पती अद्याप तुरूंगात आहे, ती अचानक जिवंत सापडली आहे. सदर प्रकरणामुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे. तसेच सदर प्रकरण उघडकीस येताच पोलिसांच्या कारभारावर स्थानिक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. महिला जिवंत असताना पोलिसांनी तिच्या पतीला हत्येची शिक्षा का ठोठावली?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिच्या वडिलांकडून सुगौली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात होते. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी महिलेचा पती शेख सद्दामला ताब्यात घेतले होते. जवळपास अडीच महिन्यांपासून शिक्षा भोगत असलेल्या सद्दामच्या नातेवाईकांनी मृत घोषित असलेल्या महिलेला जिवंत शोधले आहे. संबंधित महिला मोतिहारीमधील अगरवा या भागात सापडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मृत म्हणून घोषित असलेली महिला तिच्या प्रियकरासोबत राहत होती. ही धक्कादायक घटना सुगौली पोलिस स्टेशन हद्दीतील निमुई गावातील आहे. पकडीदयाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असणारे महिलेचे पिता सफी अहमद यांनी आपल्या जावयावर आरोप केले होते. जावई शेख सद्दामवर हुंड्यासाठी मुलगी नाजनीन खातून हिची हत्या करून मृतदेह लपवल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता.
महिलेच्या वडिलांनी केले होते गंभीर आरोप-
महिलेचे पिता सफी अहमद यांनी एफआयआरमध्ये काही गंभीर आरोप केले होते. "मुलीची हत्या केल्यानंतर नवजात अर्भकाचे अपहरण करून मुलीच्या सासरच्या मंडळींनी त्याला कुठेतरी लपवून ठेवले आहे. आमच्याकडे हुंड्यामध्ये पाच लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती आणि पैसे न दिल्याने नाजनीनला नेहमी मारहाण केली जात होती. मारहाणीदरम्यान अनेकवेळा धमकी देखील देण्यात आली होती", अशा आरोपांखाली मृत घोषित असलेल्या महिलेच्या पतीला अटक करण्यात आले. आरोपी शेख सद्दाम ४ जून पासून पोलीस कोठडीमध्ये आहे.
मृत महिलेला शोधण्यात आले यश-
हत्येच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या सद्दामच्या नातेवाईकांनी मृत घोषित असलेल्या नाजनीन खातून हिला मोतिहारी भागात जिवंत पकडले. ती तिचा प्रियकर फैयाजसोबत घरातून फरार झाली होती. फैयाजने संबंधित महिलेला मोतिहारी भागातील एका घरामध्ये लपवून ठेवले होते, जिथे तो अधूनमधून फेरफटका मारत असे. विशेष म्हणजे तिथे नाजनीन तिच्या लहान मुलासोबत राहत होती. मुलाची तब्येत अचानक बिघडल्याने ती उपचारासाठी त्याला घेऊन बाहेर पडली असता तिच्या सासरच्या मंडळींनी तिला पकडले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.