भुवनेश्वर - ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. बुधवारी येथील एक महिला विरुपा नदीत आंघोळीसाठी गेली होती. ती आंघोळ करत असतानाच पाण्यातून मोठी मगर बाहेर आली अन् तिने महिलेचं शीर धरुन तिला नेलं. पलाटपूर गावातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिल्यानंतर काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्यात जाळं फेकून महिलेचा शोध सुरू केला. मात्र, महिलेचे शीर आणि पाय नसलेला मृतदेह हाती लागला.
ज्योत्स्नाराणी जेना (३५ वर्षे) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव होतं. सध्या पावसाळ्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यातच नद्यांना भरती आल्याने या मगरी गावातील कालव्यात शिरल्या असून गावातही प्रवेश करत आहेत. त्यामुळे, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे गेल्या ३ महिन्यात मगरींच्या हल्ल्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रपाडा जिल्ह्यातील कुलसाही गावात मगरीनं ब्राह्मणी नदीच्या पात्रात अमुल्य दास नावाच्या व्यक्तीला खेचलं होतं. त्यात, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याअगोदर, घघराडीहा गावात गंगाधर तराई नावाचा व्यक्ती गावाजवळ असलेल्या कालव्यात आंघोळ करत होता. त्यावेळी मगरीनं त्याच्यावर हल्ला केला, ही घटना २९ जुलै रोजी घडली. तर २१ जून रोजी हटियागाडीतील सीतादेवी यांच्यावर मगरीनं हल्ला केला. त्यामध्ये त्यांचाही जीव गेला. गावाजवळील तलावात भांडी धुत असताना त्यांच्यासोबत जीवावर बेतलं.