Engineering College Love Story । नवी दिल्ली : बिहारच्या सीतामढी येथे एका प्रेमप्रकरणाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. येथील एक तरूण आणि तरूणी हरयाणाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकायला गेले. तिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले असे सांगितले जात आहे. परंतु, सीतामढीमध्ये प्रेम, लैंगिक शोषण, फसवणूक प्रकरण समोर आल्यानंतर याचा भांडाफोड झाला आहे. हे प्रेमीयुगुल हरयाणाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तिथून दोघेही 30 डिसेंबरला पुण्याला गेले. तेव्हापासून 3 फेब्रुवारीपर्यंत तरुणाने लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या नावाखाली हुंड्यासाठी 4.35 लाख रुपये मागितले. मग टाळाटाळ करण्यासाठी संबंधित तरूण होळी साजरी करण्यासाठी सीतामढी येथे घरी पोहोचला आणि त्याने लग्नाला नकार दिला. आता या संपूर्ण प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीसाठी अर्ज केला आहे.
दरम्यान, सीतामढी पोलिसांनी सांगितले की, एफआयआरच्या प्रक्रियेनंतर उर्वरित तपास केला जाईल, सध्या ही प्रेमाच्या नावाखाली फसवणुकीची असल्याचे दिसते आहे. सीतामढी येथील एका तरुणाने आधी एका तरुणीवर प्रेमाचे नाटक केले आणि नंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांकडून लग्नाच्या नावाखाली लाखो रुपये मागितले. पैसे घेतल्यानंतर तो होळीमध्ये घरी आला आणि तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने नकार दिला. याबाबत पीडितेने तिच्या कुटुंबीयांसह जिल्ह्यातील परिहार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याशिवाय लेखी अर्ज देखील दिला आहे.
बलात्काराच्या कलमांतर्गत खटल्यासाठी अर्जपीडित तरूणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघेही हरयाणातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. येथूनच ते एकमेकांच्या संपर्कात आले. दोघे इतके जवळ आले की 30 डिसेंबर 2022 ला ते पुण्याला गेले. इथे त्या मुलाने त्याचा खरा चेहरा दाखवला. लग्नाच्या बहाण्याने 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत सोबत ठेवले आणि यादरम्यान लैंगिक शोषण केले. मुलीने लग्न करायचे सांगितल्यावर त्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून 4 लाख 35 हजार रुपयेही मागितले. यानंतर कॉलेजची परीक्षा देण्यासाठी हरयाणात आला. त्यानंतर होळीच्या बहाण्याने तो सीतामढी येथील परिहार या त्याच्या घरी आला आणि होळीनंतर लग्न करणार असल्याचे सांगितले. घरी आल्यानंतर मुलाने लग्नास नकार दिल्याने मुलीने बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"