अहमदाबाद - गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. काही दिवसांचा उरलेला पगार मागितल्याने उद्योजक महिलेने दलित युवकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसंच इतर १२ लोकांनीही सदर युवकाला पट्ट्याने मारहाण करत त्याच्या तोंडात बूट कोंबण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर मोरबी पोलिसांनी आरोपी विभूती पटेल या महिलेसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश किशोरभाई दलसानिया हा तरुण २ ऑक्टोबरपर्यंत रानीबा इंडस्ट्रीज येथे काम करत होता. वैयक्तिक कारणांमुळे नंतर त्याने कामावर जाण्यास नकार दिला. मात्र काम केलेल्या दिवसांचाही कंपनीकडून पगार न मिळाल्याने त्याने फोन करत पगाराची मागणी केली. त्यानंतर कार्यालयातील व्यक्तींना नीलेशला इथं येऊन पगार घेऊन जा, असं सांगितलं. त्यानुसार नीलेश दलसानिया हा आपल्या एका मित्रासह पगार आणण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात गेला. मात्र तिथं गेल्यानंतर विभूती पटेल या महिलेसह तेथील इतर कर्मचाऱ्यांनी नीलेशला पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसंच त्याच्या तोंडात बूट कोंबण्याचा प्रयत्न केला.
कोण आहे विभूती पटेल?
विभूती पटेल ही महिला उद्योजक इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असून आपण रानीबा इंडस्ट्रीजची संस्थापक असल्याचा उल्लेख तिने केला आहे. तसंच विविध व्हिडिओ पोस्ट करत विभूती पटेलने स्वत:ची लेडी डॉन अशी प्रतिमा तयार केली आहे. मात्र आता पगार घेण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण केल्याने ती वादात सापडली असून पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. याप्रकरणी रानीबा इंडस्ट्रीजकडून अद्याप त्यांची बाजू मांडण्यात आलेली नाही.
जखमी तरुणावर उपचार सुरू
बेदम मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला पोलिसांनी मोरबीतील सरकारी रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी नीलेशच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल केले असून अधिक तपास केला जात आहे.