नाशिक : शिधापत्रिकेवर नाव असलेल्या लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती थेट पुरवठा खात्याला जोडण्यासाठी रेशन दुकानदारांची होत असलेली आडकाठी लक्षात घेता थेट युनिक आयडेंटीफिकेशन आॅथोरिटी खात्याकडूनच सर्व आधार कार्डधारकांची माहिती मागविण्याचा निर्णय पुरवठा खात्याने घेतला आहे. या माहितीमुळे येत्या काही दिवसांतच पुरवठा खात्याचे दप्तर अद्ययावत होण्याबरोबरच आधारशी जोडल्या गेलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच धान्याचा लाभ मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुरवठा खात्याचे दप्तर अद्ययावतीकरण केले जात असून, त्यात शिधापत्रिकाधारकांची माहितीही संगणकात भरली जात आहे. परंतु अनेक शिधापत्रिकेवर मृत व्यक्ती तसेच स्थलांतरित झालेल्यांची नावे वर्षानुवर्षे तशीच ठेवून त्या आधारे शिधापत्रिकाधारकाकडून स्वस्त दरातील धान्य लाटले जात असल्याच्या तक्रारी आहेत. वेळोवेळी पुरवठा खात्याने शिधापत्रिकाधारकांकडून अर्ज भरून घेत माहितीची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिधापत्रिकाधारक देत असलेल्या माहितीची पडताळणी करण्याची कोणतीही यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नसल्याने हा प्रश्न कायम होता. त्यावर पर्याय म्हणून शिधापत्रिकेत नाव असलेल्या व्यक्तींच्या आधारकार्ड क्रमांकाची माहिती गोळा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे काम करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे रेशन दुकानदारांवरच जबाबदारी सोपविली.४प्रत्यक्षात त्याला रेशन दुकानदारांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला. परिणामी पुरवठा खात्याच्या दप्तर अद्ययावतीकरणाला खीळ बसू लागल्याने थेट केंद्र सरकारच्या अखत्यारितील युनिक आयडेंटीफिकेशन म्हणजे भारतीय नागरिकत्व ओळख प्राधिकरणाशीच संपर्क साधून त्यांच्याकडून प्रत्येक नागरिकाच्या आधारकार्ड क्रमांकाची माहिती गोळा करण्याचे ठरविण्यात आले.‘आधार’शी जोडलेल्यांना धान्य४शिधापत्रिकेवर नाव व आधार कार्ड क्रमांक असलेल्यांची माहिती जुळवून पुरवठा खात्याचे दप्तर अद्ययावत करण्यात येणार असून, त्यात ज्यांचे आधार क्रमांक असतील अशांनाच शिधापत्रिकेवर धान्य दिले जाईल. त्यातून शिधापत्रिकेवर बोगस नावे असलेले आपोआपच बाद ठरतील, परिणामी शासनाच्या योजनेचा लाभ खऱ्या लाभेच्छुकाला मिळेल.
‘आधार’चा डाटा थेट पुरवठा खात्याला
By admin | Published: February 04, 2016 3:11 AM