नवी दिल्ली: आता मोबाइल सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही. सिम कार्डची विक्री करताना ग्राहकाकडून वाहन चालक परवाना, पासपोर्ट आणि मतदान ओळखपत्र स्वीकारण्याचे आदेश सरकारनं मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सना दिले आहेत. कंपन्यांनी या आदेशांची त्वरित अंमलबजावणी करावी, अशा सूचना दूरसंचार सचिव अरुण सुंदराजन यांनी दिल्या आहेत. ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेण्याची सूचना सरकारकडून कंपन्यांना करण्यात आलीय.आधार कार्ड नसलेल्या लोकांना सिम कार्ड मिळत नसल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं. त्यानंतर आधार कार्डव्यतिरिक्त इतर ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड देण्याच्या सूचना सरकारनं मोबाइल ऑपरेटर्सना केली. जोपर्यंत या प्रकरणात अंतिम निर्णय दिला जात नाही, तोपर्यंत सिम कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य असणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं आधीच स्पष्ट केलंय. याबद्दल दूरसंचार सचिव अरुण सुंदराजन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राकडे प्रतिक्रिया दिली. 'एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसल्यास त्याला सिम कार्ड नाकारु नका, अशा सूचना दूरसंचार मंत्रालयाकडून सर्व टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. ग्राहकाकडून इतर ओळखपत्र स्वीकारणाच्या सूचना कंपन्यांना करण्यात आल्या आहेत,' असं सुंदरराजन यांनी म्हटलं. दूरसंचार विभागानं आधी दिलेल्या आदेशांमुळे मोबाइल कंपन्या सिम कार्ड देताना आधार कार्डची मागणी करायच्या. लोकनिती फाऊंडेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर दूरसंचार विभागानं सिम कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक केलं होतं. मात्र सिम कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचा कोणताही निकाल आपण दिला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यामुळेच आता दूरसंचार विभागानं आधार कार्डऐवजी इतर ओळखपत्रांच्या आधारे सिम कार्ड देण्याच्या सूचना मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्सना केल्या आहेत.
मोबाइल सिमसाठी आधारसक्ती नाही; सरकारचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 8:34 AM