प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत झालेल्या विवादानंतर यूपीएससीने असे प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने यूपीएससीला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र हे व्हेरिफिकेशन ऐच्छिक असेल.
केंद्र सरकारकडून आधार आधारित ओळख पटवण्याची परवानी मिळाल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील नोटिफिकेशनही प्रसिद्ध केलं आहे. यात केलेल्या उल्लेखानुसार यूपीएससीला वन टाइम रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करत असताना आणि परीक्षा, भरती परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी ऐच्छिक आधारावर ऑथेंटिकेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी ई केवायसी ऑथेंटिकेशन सुविधेचाही उपयोग केला जाणार आहे.
आयोगाला आधार अधिनियम २०१६ मधील सर्व तरतुदी, त्याच्या अंतर्गत बनवण्यात आलेले नियम आणि विनियम आणि भारतीय विशिष्ट्य ओळख प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल, असंही या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे.
यूपीएससीने मागच्या महिन्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती. तसेच परीक्षेमध्ये केलेल्या फसवणुकीच्या प्रयत्नामुळे भविष्यात कुठल्याही परीक्षेत सहभागी होण्यासही स्थगिती दिली होती. पूजा खेडकर यांच्यावर बनावट अपंगत्व प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट बनवण्यासह अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत.