नवी दिल्ली - केंद्र सरकार अनेक योजनांना आधार कार्डसोबत लिंक करत आहे. पॅन कार्डलाही आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आलंय. विशेष म्हणजे पॅन कार्डला लिंक न केल्यास पुढील वर्षापासून ते पॅनकार्ड बंद होऊ शकते. आता केंद्र सरकारद्वारे जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्यालाही आधार कार्डसोबत जोडण्याची योजना बनवत आहे. देशातील काही राज्यांमध्ये लवकरच ते लागूही करण्यात येईल.
सरकारला एक ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम बनविण्यास मदत मिळणार आहे. आधार कार्ड हे जाती आणि उत्पन्न प्रमाणपत्रासोबत लिंक झाल्यास विविध योजनांच्या लाभासाठी नागरिकांना फायदाच होईल. तसेच, अपात्र लोक या योजनांचा लाभ मिळवू शकणार नाहीत. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात शिष्यवृती देण्याचं काम सरकार या माध्यमातून करणार आहे. त्यातून, 60 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. जात प्रमाणपत्र आणि उत्पन्न हे आधार कार्डशी लिंक करण्यात आल्यास, ऑटोमैटिक वेरिफिकेशन सिस्टीमद्वारे योग्य त्याच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास सरकारला मदत होईल.
ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टमद्वारे स्कॉलरशिप वाटण्याचं काम केंद्र सरकार सर्वात आधी राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाना राज्यात करणार आहे. या राज्यांमध्ये जाती आणि उत्पन्न प्रमाणपत्रांना आधारशी लिंक करण्याचं काम पूर्ण होत आलं आहे. यामुळे पात्र विद्यार्थ्यांना वेळतच स्कॉलरशिप मिळू शकेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सचिवांसोबत बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे