हैदराबाद, दि. 21 - दारू विकत घेणं आता सोपं काम राहिलेलं नाही. कारण आता दारू विकत घेण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. तेलंगणामध्ये उत्पादन शुल्क विभागाने पबमधून दारू विकत घेण्यासाठी आता ओळखपत्र सक्तीचं केलं आहे.
काही दिवसांपूर्वी येथे एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा 17 वर्षांच्याच विद्यार्थ्यांने खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली. तसंच 21 वर्षांखालील मुलामुलींना पबमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. याशिवाय अनेक पबमध्ये ड्रग्स आणि नशेचे पदार्थ विकले जात असल्याचा संशय आहे, त्यामुळे 21 वर्षांखालील मुलामुलींना पबमध्ये प्रवेश नाकारावा आणि ग्राहकांचं वय सिद्ध करण्यासाठी ओळखपत्र मागावं तसंच एका रजिस्टरमध्ये ग्राहकाच्या डिटेलची नोंदणी केली जावी असे आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत.
केंद्र सरकार सर्व आवश्यक सेवांसाठी आधार कार्ड जोडणी सक्तीची करण्यामध्ये व्यस्त आहे. मोबाइल आणि पॅन कार्डला आधार कार्डसोबत जोडल्यानंतर सरकार ड्रायव्हिंग लायसन्सदेखील आधारसोबत जोडण्याची तयारी करत आहे.