ऑनलाइन लोकमत
सीकर (राजस्थान), दि. ११ - प्रत्येक भारतीयाला 'ओळख' मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आधार कार्ड योजनेचा लाभ आता देवांनाही दिला जात असल्याचे समोर आले आहे. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात श्रीरामांचे परमभक्त हनूमान यांच्या नावाने आधार कार्ड काढण्यात आला असून पोस्ट ऑफीसमधील कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे.
सीकर जिल्ह्यातील दातारामगढ पोस्ट ऑफीसमध्ये काही दिवसांपूर्वी एक आधारकार्ड आला होता. मात्र त्यावरील अपु-या पत्त्यामुळे पोस्टातील कर्मचा-यांनी नाईलाजास्तव कार्ड तपासून बघितला. आधार कार्ड चक्क हनूमान यांच्या नावाने होते आणि छायाचित्रही हनूमान यांचेच होते. यावर कळस म्हणजे कार्डवर वडिलांचे नाव म्हणून पवन असा उल्लेख होता. अखेरीस पोस्टातील कर्मचा-यांनी पोस्टातील कर्मचा-यांनी आधार कार्डावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. हा नंबर आधार कार्ड काढण्याचे कंत्राट दिलेल्या एजंसीतील कर्मचा-याचा आहे. मात्र कार्डावर हनूमान हे नाव कोणी टाकले, त्याचा नंबर कार्डवर कसा हे माहित नसल्याचे त्या तरुणाने स्पष्ट केले. मात्र या घटनेमुळे आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. तर आता या कार्डचे काय करायचे असा प्रश्न पोस्ट ऑफीसमधील कर्मचा-यांना पडला आहे.