पाटणा : बिहारमध्ये शालांत परिक्षेसाठी आणि इंटरच्या वर्गासाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यातील टॉपर घोटाळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शालेय परिक्षांसाठी आधार कार्ड अनिवार्य करणारे बिहार हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. बिहार विद्यालय परिक्षा समितीने हा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी सांगितले की, २०१७ च्या शालांत आणि इंटर परिक्षेसाठी फॉर्ममध्ये आधार कार्डचा एक कॉलम असेल. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मॅट्रिक इंटर कम्पार्टमेन्टल परिक्षेपासून याची अंमलबजावणी होईल. विद्यार्थ्यांनी कुठल्याही परिस्थितीत आपला आधार नंबर मिळवावा, असे बोर्डाने सूचित केले आहे. तथापि, विद्यार्थ्यांना आता या परिक्षा फॉर्मसोबत आपला मोबाईल नंबर आणि ई मेल आयडीही द्यावा लागेल. या परिक्षेसंबंधीच्या सूचना मोबाईलवरुन पाठविल्या जातील. तर ई मेल विद्यार्थ्यांच्या कॉन्टेक डिटेलशी जोडला जाईल. (वृत्तसंस्था)
बिहारमध्ये परीक्षेसाठी आधार कार्ड आवश्यक
By admin | Published: September 05, 2016 4:16 AM