नवी दिल्ली : करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी 31 मार्च 2019 पर्यंत वाढविली आहे. नवा आयकर कायदा 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. त्यानुसार करदात्यांना पॅन आणि आधार नंबर लिंक करण्यास सांगण्यात आले. परंतु त्यानंतर लिंक करण्यासाठी दिलेली मुदत आतापर्यंत 31 जुलै 2017, 31 आॅगस्ट 2017, 31 डिसेंबर 2017, 31 मार्च 2018 आणि 30 जून 2018 याप्रमाणे वाढवून देण्यात आली होती. ही मुदत आता पुन्हा 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्राने बँक खाते, मोबाइल क्रमांक आदींसाठी आधार लिंक करणे सक्तीचे केले आहे. तसेच एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्रानं केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. विविध सेवांना आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे न्यायालयानं आदेश दिले होते. त्यावेळी सरकारने अतिरिक्त दोन महिने वाढवत 30 जूनपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा पुढील वर्षाच्या 31 मार्च 2019पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. गेल्या मार्चअखेरपर्यंत 33 कोटींपैकी 16 कोटी 65 लाख पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची माहिती समोर आली आहे.