Aadhar Voter ID Link : आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी(18 मार्च 2025) झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत देशाच्या निवडणूक आयोगाने या दोन्ही ओळखपत्रांना जोडण्यास परवानगी दिली. या संदर्भात निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार, संविधानाच्या कलम 326 आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) नुसार मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केले जाईल. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता.
आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव, विधान विभागाचे सचिव, MeitY चे सचिव आणि UIDAI चे CEO आणि ECI च्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा निर्मण घेण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत मतदार हो दोन्ही ओळखपत्र लिंक करण्याची मोहीम अधिक तीव्र केली जाईल.
तांत्रिक तज्ज्ञांची लवकरच चर्चा सुरू होणारUIDAI आणि ECI च्या तांत्रिक तज्ञांमध्ये तांत्रिक सल्लामसलत देखील लवकरच सुरू होणार आहे. देशात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर कायमस्वरुपी आणि शास्त्रीय तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
विरोधकांचे आरोपगेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस, शिवसेना (UBT), NCP (SCP) आणि BJD सारख्या अनेक राजकीय पक्षांनी समान EPIC क्रमांक असलेल्या मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. आयोगाने मान्य केले आहे की, काही राज्यांमध्ये, खराब अल्फान्यूमेरिक मालिकेमुळे सारखेच क्रमांक चुकून पुन्हा जारी केले गेले, परंतु याला फसवणूक म्हणता येणार नाही. आता आयोगाने या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत.
बनावट मतदार ओळखण्यास मदत होईलनिवडणूक आयोगाने नुकताच निर्णय घेतला आहे की, ते पुढील तीन महिन्यांत डुप्लिकेट क्रमांक असलेल्या मतदार ओळखपत्रांना नवीन EPIC क्रमांक जारी करतील. डुप्लिकेट क्रमांक असण्याचा अर्थ बनावट मतदार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. EPIC शी आधार लिंक करण्यामागील मुख्य उद्देश मतदार यादीतील अनियमितता दूर करणे आणि ती स्वच्छ करणे हा आहे. या पाऊलामुळे बनावट मतदार ओळखण्यास मदत होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाला आहे. मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे बनावट मतदानाला आळा घालण्यात मदत होऊ शकते. ही प्रणाली लागू झाल्यानंतर एका व्यक्तीने अनेक ठिकाणी मतदान करण्याची शक्यता नाहीशी होऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.