बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी असलेल्या आदित्य पांडेची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. रिलेशनशिपमध्ये जेव्हा ब्रेकअप झालं. तेव्हा त्याने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याऐवजी त्याला नवी दिशा दिली. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरी मिळवण्याचा त्याने निश्चय केला आणि त्यासाठी प्रयत्न केले.
आदित्य पांडेचा जन्म बिहारमधील पाटणा येथील विशुनपूर पकरी या छोट्याशा गावात झाला. पाटणा येथील केंद्रीय विद्यालय कंकरबाग येथून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. आठवी आणि नववीत अव्वल आलेल्या आदित्यची दहावीत एक गर्लफ्रेंड होती. तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो खूप नाराज झाला होता. मग त्याने त्या मुलीला सांगितले की एक दिवस तो आयएएस अधिकारी होऊन दाखवेल.
आदित्य पांडेने एलपीयू, पंजाबमधून इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशनमध्ये डिग्री घेतली आहे. त्याला इंजिनीअरिंगमध्ये अजिबात रस नव्हता. म्हणूनच 2018 मध्ये आयआयटी रुरकीमधून एमबीए केलं. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेत काम केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्राबाबत समजलं. 2019 मध्ये बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्याने जानेवारी 2020 पासून यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
आदित्यने यूपीएससी परीक्षेसाठी तीन वेळा प्रयत्न केले होते. UPSC 2021 मध्ये फक्त 2.5 गुणांनी नापास झाला. त्याने पुढील प्रयत्नासाठी कठोर परिश्रम केले आणि UPSC निकाल 2022 मध्ये 48 व्या क्रमांकासह IAS अधिकारी बनला. आदित्यपासून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.