मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत. या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले. निमंत्रण देण्यासाठी आज रात्री उशिरा आदित्य ठाकरे दिल्लीला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्तिगत कारण देत शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसह ४०० शेतकऱ्यांना आणि एका वारकरी दाम्पत्यालाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.