नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविल्यानंतर आता आम आदमी पक्षाने (AAP) देशातील इतर राज्यांमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: या वर्षी किंवा पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सध्या पक्षाने नऊ राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार करताना प्रभारी आणि संघटनेतील लोकांची नावे जाहीर केली आहेत. या राज्यांमध्ये दक्षिण भारतातील राज्यांचाही समावेश होतो.
पक्षाच्या वतीने नऊ राज्यांतील नवनियुक्त अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या नऊ राज्यांमध्ये असाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. पक्षाने या राज्यांतील प्रभारी आणि संघटनेच्या लोकांची नावे जाहीर केली आहेत.
पंजाब राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 117 जागांपैकी 92 जागा जिंकत मोठे यश संपादन केले. या विजयानंतर आता पक्षाच्या राष्ट्रीय विस्तारावर अधिक भर दिला जात आहे. सध्या पक्षाने नऊ राज्यांमध्ये संघटना विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात इतर राज्यांमध्येही याचा विस्तार केला जाईल.