नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकीय मैदानात उतरलेल्या गौतम गंभीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने (आप) असा दावा केला आहे की, गौतम गंभीरचे नाव मतदार यादीत दोनवेळा नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी गौतम गंभीर विरोधात दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर 1 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
गौतम गंभीरजवळ राजेंद्र नगर आणि करोल बागमधील दोन मतदान कार्ड आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्याला एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर केला आहेत. यावेळी आतिशी म्हणाल्या,'आम्ही याप्रकरणी गौतम गंभीरविरोधात तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार केली आहे.'
तसेच, ट्विटरच्या माध्यमातून आतिशी यांनी गौतम गंभीरला मतदान करुन आपले मत व्यर्थ करु नका असे आवाहन केले आहे. 'गौतम गंभीरला मतदान करुन आपले मदतान व्यर्थ करु नका. त्यांना लवकरच दोन मतदान कार्ड बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविले जाईल. आपले मतदान व्यर्थ करु नका.'
याप्रकरणी गौतम गंभीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, गौतम गंभीर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून त्याला भाजपाने पूर्व दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. गौतम गंभीरची विचारधारा ही भाजपासारखीच आहे. जेव्हा गौतम गंभीर दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भूषवत होता. तेव्हा केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे दिल्लीच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून अरुण जेटली आणि गौतम गंभीर या दोघांचे चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहेत. गौतम गंभीर हा अरुण जेटली यांचा आवडता खेळाडू होता. त्याचबरोबर आता निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे.
दिल्लीतील उमेदवारांमध्ये गौतम गंभीर श्रीमंत उमेदवारलोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत विविध पक्षांचे मिळून 349 उमेदवार उभे आहेत आणि त्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून गंभीरने मान पटकावला आहे. उमेदवारी अर्ज भरताना गौतम गंभीरने आपली संपत्ती जाहीर केली आणि त्यात तो 147 कोटींच्या संपत्तीचा मालक असल्याचे समोर आले आहे. 2017-18च्या प्राप्ती कर परतावात गौतम गंभीरने त्याचे उत्पन्न 12.40 कोटी असल्याचे जाहीर केले आहे, तर त्याची पत्नी नताशाच्या प्राप्ती कर परतावात 6.15 लाखाचे उत्पन्न दाखवले आहे. पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 45 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 12 कोटींची वाढ झाली आहे.
जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली होती. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली होती. यानंतर गौतम गंभीर आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली होती. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले.