काँग्रेससोबतची आघाडी बारगळली? 'आप'ने 20 उमेदवारांची केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:17 PM2024-09-09T16:17:59+5:302024-09-09T16:20:26+5:30
AAP Candidate List : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच आपने उमेदवार जाहीर केले.
AAP Candidates Haryana Assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी बारगळल्याचे निश्चित मानले जात आहे. आपने विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची नावे जाहीर केली असून, काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघातही उमदेवार उतरवले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आप आणि काँग्रेसमधील आघाडी करण्यासंदर्भातील चर्चा अपयशी झाली. कारण आम आदमी पक्षाला १० किंवा १० पेक्षा जास्त जागा हव्या होत्या. पण, ३ पेक्षा जास्त जागा देण्यास काँग्रेस तयार नव्हती.
'आप'ने चर्चा पूर्ण होण्यााधीच जाहीर केले उमेदवार
आपचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सोमवारी सकाळीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, सायंकाळपर्यंत तोडगा निघाला नाही, तर आप ९० जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करेल. आप-काँग्रेसमधील चर्चेचे काय झाले, याचे उत्तर मिळण्याआधीच आपने 20 उमेदवार जाहीर केले.
काँग्रेसच्या विरोधात 'आप'ने दिले उमेदवार
हरियाणा विधानसभेच्या ज्या ११ जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. तिथे आम आदमी पक्षाने उमेदवार दिले आहेत. यात उचाना कला मतदारसंघातून पवन फौजी, मेहममधून विकास नेहरा, बादशाहपूरमध्ये बीर सिंह सरपंच यांना उमेदवारी दिली आहे.
📢Announcement 📢
— AAP Haryana (@AAPHaryana) September 9, 2024
The Party hereby announces the following candidates for the state elections for Haryana Assembly.
Congratulations to all 💐 pic.twitter.com/9d7z63IUab
त्याचबरोबर नारायगडमधून गुरपाल सिंह, समालखामधून बिट्टू पहेलवान, दाबवली मतदारसंघातून कुलदीप गदराना, रोहतकमधून बिजेंद्र हुड्डा, बहादूरगढमधून कुलदीप चिकारा, बादली विधानसभा मतदारसंघातून रणबीर गुलिया, बेरी मतदारसंघात सोनू अहलावत आणि महेंद्रगढ मतदारसंघातून मनीष यादव यांना आपने उमेदवारी दिली आहे. या सगळ्या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार उतरवलेले आहेत.
हरियाणात आप स्वबळावर
काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचे आपकडून सांगितले जात होते. पण, चर्चेदरम्यानच पहिली यादी आम आदमी पक्षाने जाहीर केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे उमेदवार असलेल्या विधानसभा मतदारसंघातही आपने उमेदवार दिले आहेत. काँग्रेसविरोधात उमेदवार दिल्याने हरियाणात आप-काँग्रेस आघाडी फिस्कटल्याचे निश्चित मानले जात असून, आप स्वबळावर लढणार, हे स्पष्ट झाले आहे.