Arvind Kejriwal News: देशभरात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. यातच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, गॅरेंटी हा शब्दप्रयोग आम्हीच सुरू केला होता. केजरीवाल यांची गॅरेंटी आहे, असे सांगत जनतेला आश्वासने दिली होती. मात्र, आता अन्य पक्षांकडून याचा वापर केला जातो. जाहीरनामा, संकल्प पत्र गायब झाले, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.
७५ वर्षापासून काँग्रेसने देशाला अशिक्षित ठेवले
अन्य पक्ष अनेक गोष्टी मोफत देण्याबाबत प्रचार करतात. मात्र शिक्षणाबाबत कोणी बोलत नाही. आमचा पक्ष शिक्षणावर भर देत आहे. काँग्रेस असो वा भाजप असो, कोणताही पक्ष तुमच्या मुलांसाठी शाळा बांधू, असे सांगत नाही. गेल्या ७५ वर्षांपासून मुद्दामहून काँग्रेसने देशाला अशिक्षित ठेवले. गेल्या ७ वर्षांत आम आदमी पक्षाच्या सरकारने २ कोटींना चांगले शिक्षण दिले. आम आदमी पक्ष असे करू शकतो, तर काँग्रेसला ७५ वर्षांत १४० कोटी जनतेला शिक्षण देणे शक्य नव्हते का, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली.
दरम्यान, मनिष सिसोदिया यांची पत्नी आजारी आहे, त्यांचा मुलगा कॅनडामध्ये शिकतो. तरीही त्यांना १० महिने तुरुंगात ठेवले. मनिष सिसोदिया यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ते उद्या बाहेर येतील. मनिष सिसोदिया हे भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे शिष्य आहेत, ते मरण पत्करतील. परंतु, देशाशी तडजोड करणार नाहीत, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.