नवी दिल्ली : जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या सुशीलकुमार रिंकू यांनी काँग्रेसच्या करमजित कौर चौधरी यांचा ५८ हजार ६९१ मतांनी पराभव करीत लोकसभेत आम आदमी पार्टीने पुनरागमन केले. या विजयामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत चालत असताना काँग्रेसचे संतोखसिंह चौधरी यांचे ह्रदयविकारामुळे निधन झाले होते. सुशीलकुमार रिंकू यांना ३ लाख २ हजार ९७, करमजित कौर चौधरी (काँग्रेस) यांना २ लाख ४३ हजार ४५०, डॉ. सुखविंदर सुखी (अकाली दल) यांना १ लाख ५८ हजार ३५४, तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या भाजपच्या इंदर इक्बालसिंह अटवाल यांना १ लाख ३४ हजार ७०६ मते मिळाली. १९९९ पासून काँग्रेसचे जालंधर लोकसभा मतदारसंघावर असलेले वर्चस्व आज मोडीत निघाले.
ओडिशात झारसुगुडा विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ बीजू जनता दलाच्या उमेदवार दीपाली दास यांनी भाजपचे टंकधर त्रिपाठी यांचा ४८ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. मेघालयात सोहियोंग विधानसभा मतदारसंघात युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार सिन्शर कुपर रॉय लिंगदोह थबाह यांनी एनपीपीच्या उमेदवाराचा पराभव केला.
उत्तर प्रदेशात अपना दलचा विजय उत्तर प्रदेशात स्वार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सहकारी पक्ष अपना दल (सोनेलाल) चे उमेदवार शफीक अहमद अन्सारी हे विजयी झाले. त्यांनी सपाच्या अनुराधा पटेल यांचा ८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला, तर मिर्झापूर जिल्ह्यातील छानबे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपना दलच्या रिंकी कोल यांनी सपाच्या कीर्ती कोल यांचा पराभव केला.