नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आम आदमी पार्टी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चर्चेत असलेले शाहीन बागचे ज्या मतदारसंघात येते त्या ओखला विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार अमानतुल्लाह खान मोठ्या बहुमताने पुढे असल्याचे बोलले जात आहे. तर याचवेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला असून, दिल्लीच्या जनतेने आज भाजपा आणि गृहमंत्री अमित शहा यांना करंट दिला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात भाजपने शाहीन बागचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्यावरून अमित शहा यांनी आपवर टीका केली होती."दिल्लीतील जनतेने ईव्हीएम मशीनचे बटन एवढ्या जोरात दाबावे की, मत आम्हांला मिळेल आणि त्याचा करंट शाहीन बागेत बसेल”, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या याच विधानावरून अमानतुल्लाह खान यांनी अमित शहा यांना प्रतिउत्तर दिले आहे. तर आज विकासाचा विजय तर द्वेषचा पराभव झाला असल्याचेही ते म्हणाले.
2015 मध्ये दुसऱ्यांदा दिल्लीची सत्ता हस्तगत केल्यापासून अरविंद केजरीवाल यांनी ठराविक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत काम सुरू केले. त्यांनी दिल्लीत उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर भर दिला. केजरीवाल सरकारने उचललेल्या या पावलाचा लाभ दिल्लीतील बहुतांश जनतेला झाला. तसेच मोफत वीज आणि पाणी पुरवण्याचा त्यांचा निर्णय दिल्लीतील गरीब वर्गात बऱ्यापैकी लोकप्रिय झाला. त्याचा लाभ या आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसून येत आहे.