नवी दिल्ली : ‘आप’ हा पक्ष ‘आपदा’ (संकट) असून, त्याने मागील दहा वर्षे देशाची राजधानी दिल्लीला ग्रासले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. दिल्लीतील गृहनिर्माण आणि शिक्षण क्षेत्रांसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले.
दिल्लीमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आप, भाजप, काँग्रेस पक्ष पूर्वतयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची पूर्वतयारी म्हणून पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दिल्लीत आपची सत्ता पुन्हा आली तर या शहराची स्थिती आणखी बिकट होईल. या शहरामध्ये उत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील असताना आपचे सरकार खोटे दावे, ढोंगीपणा या गोष्टींच्या आधारे कारभार करीत आहे.
मोदी पुढे म्हणाले, आपच्या सरकारने दिल्लीत केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’सारख्या आरोग्य योजना लागू न केल्याने तेथील जनता महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहात आहे. दिल्लीत उत्तम रस्ते, गरिबांसाठी घरे बांधण्याबाबत केंद्र सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. या कामांत आपचा हस्तक्षेप नसल्याने हे शक्य झाले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, मीदेखील एक ‘शीश महाल’ बांधू शकलो असतो; पण, देशातील प्रत्येकाला घर देण्याचं माझं स्वप्न आहे. त्याची पूर्तता आम्ही करणारच. केजरीवाल यांनी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. त्या निवासस्थानाला मोदींनी ‘शीश महाल’ असे संबोधले.
मोदींच्या हस्ते झाला प्रकल्पांचा प्रारंभ- पंतप्रधान मोदींनी १,६७५ झोपडपट्टीधारकांसाठी फ्लॅट्ससह दोन शहरी पुनर्विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन - रोशनपुरा, नजफगड येथे वीर सावरकर महाविद्यालयाच्या इमारतीची केली पायाभरणी - पूर्व दिल्लीतील शैक्षणिक भवन आणि द्वारका येथील शैक्षणिक भवनाच्या कामाचाही केला प्रारंभ