विधानसभेतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यालयातून संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हुतात्मा भगत सिंग यांचे फोटो हटवण्यात आले आहेत, असा दावा दिल्लीतील विरोधीपक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. यासंदर्भात बोलताना, यावरून भाजपचे दलित विरोधी राजकारण दिसून येते, असे माजी मुख्यमंत्री आतिशी यंनी म्हटले आहे.
विरोधीपक्षनेत्या आतिशी म्हणाल्या, "दिल्ली सरकारमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक सरकारी कार्यालयात डॉ आंबेडकर आणि हुतात्मा भगत सिंग यांचा फटो लागत होता. मात्र, आज आम्ही मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या विधानसभेतील कार्यालयात भेटण्यासाठी गेलो असता, हे दोन्ही फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून काढण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याचा तीव्र विरोध करतो. मुख्यमंत्री कार्यालयात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महात्मा गांधी यांचा फोटो लावला आहे, असा दावा आपने केला आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल -दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, "दिल्लीतील नव्या भाजप सरकारने बाबासाहेबांचा फोटो हटवून पंतप्रधान मोदींचा फोटो लावला. हे योग्य नाही. यामुळे बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांना दुःख झाले आहे. माझी भाजपला एक विनंती आहे. आपण पंतप्रधानांचा फोटो लावा. पण बाबासाहेबांचा फोटो तर हटवू नका. त्यांचा फोटो असू द्या."
या फटोच्या मुद्द्यावरून विधानसभेतही जोरदार गदारोळ झाला. आतिशी यांनी नवे स्पीकर विजेंद्र गुप्ता यांना शुभेच्छा देत फोटो हटवणे अपमानास्पद असल्याचेही म्हटले आहे. यावरून आमदारही गदारोळ करताना दिसून आले. यावर सभापती विजेंद्र गुप्ता म्हणाले, हे एक शिष्टाराचे भाषण होते. राजकीय व्यासपीठ करायला नको होते. मी आतिशी यांच्या वर्तनाची नंदा करतो.